खड्डे न बुजवल्याने घडताहेत अपघाताच्या घटना
फलटण – येथील जुन्या स्टेट बॅंक कॉलनी रिंगरोडलगत एका खासगी मोबाइल कंपनीने केबल टाकण्यासाठी विनापरवाना रस्ता खोदला आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने खोदकाम करण्यात आले असून जबाबदार कंपनी, कंत्राटदार व अभियंत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली
आहे.
फलटण शहरात दरवर्षी मोबाइल कंपन्यांकडून ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. या कामाला परवानगी देताना नगरपरिषदेकडून शुल्क आकारण्यात येते. कंपनीकडून अनामत रक्कमही घेतली जाते. मात्र, जुन्या स्टेट बॅंक कॉलनी रिंगरोडलगत शनिवारी (दि. 23) शासकीय सुट्टीच्या दिवशी करण्यात आलेल्या खोदकामास परवानगी दिले नसल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.
याबाबत वाहतूक शाखा व संबंधित विभागालाही पूर्वकल्पना दिली नसल्याची माहिती आहे. शहरात गेल्या दोन-तीन महिन्यांत अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. यापैकी अनेक कामांसाठी परवानगी घेण्यात आली नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. खोदकामाचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेले खड्डे पुन्हा डांबराने किंवा कॉंक्रिटने बुजवण्याच्या अटीवर ही परवानगी दिली जाते. या अटी मान्य करूनच कंपन्या कामाला सुरुवात करतात.
मात्र, कंपन्यांच्या ठेकेदारांनी या अटी धुडकावून लावत रस्त्यालगत खड्डे खोदले आणि ते व्यवस्थित न बुजवता तसेच सोडून दिले आहेत. ही कामे अटींनुसार झाली का? परवानगी आहे का? कामासाठी मुदत किती? मुदत संपल्यावरही खोदकाम करण्यात आले का? परवानगीपेक्षा जास्त खोदकाम करण्यात आले का? या कामांची चौकशी कोण करणार, असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत. खड्डे न बुजवल्याने अनेक वेळा अपघात घडून वाहनचालक अथवा प्रवाशांनी नाहक जीव गमावले आहेत. शहरात विनापरवाना खोदकाम केल्याने नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे या कामांची पाहणी करून जबाबदार कंपनी, कंत्राटदार व अभियंत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिक करत आहेत.