मंचर पोलिसांनी केली कारवाई
मंचर – मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतून गेल्या चार दिवसात दररोज कांद्याची एक पिशवी, अशा एकुण चार पिशव्या चोरुन नेणाऱ्या दोन महाठकांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. मंचर बाजार समितीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कांदा पिशवी चोरणारे चोरटे जेरबंद झाले आहे. त्यानुसार पोलसांनी कारवाई केली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत किरण रावजी वाघ यांचा कांदा खरेदीचा गाळा आहे. बुधवारी (दि. 6) रात्री सात वाजता घरी जाताना त्यांनी सात कांद्याच्या पिशव्या मोजून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता सात कांदा पिशव्यामधील तीन कांदा पिशव्या कमी असल्याचे दिसुन आले. त्यामुळे तीन कांदा पिशव्या अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याचा त्यांना संशय बळावला.
तेथे असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आणि इतर नागरिकांकडुन माहिती घेतली असता अज्ञात व्यक्ती कांदा पिशव्या चोरुन घेवुन जाताना दिसुन आले. त्यामुळे संबधित व्यक्तीवर पाळत ठेवली असता रविवारी (दि.10) पुन्हा एक कांदा पिशवी उचलून घेवुन जात असताना किरण युवराज डगळे आणि दिपक श्रीरंग इंगळे (रा. मंचर) हे दोघेजण दिसुन आले.
त्यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असुन एकुण चार कांदा पिशव्यांचे 60 रुपये प्रतिकिलोप्रमाणे 14 हजार 100 रुपये किमतीच्या कांद्याची चोरी करण्यात आल्याचे व्यापारी किरण वाघ यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. मंचर पोलिसांनी दोघांना अटक केली असुन घोडेगाव न्यायालयाने त्यांना गुरुवार (दि.14) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या घटनेचा तपास मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी चंद्रशेखर डुंबरे, चंद्रकांत वाघ, योगेश रोडे, कृष्णा पाबळे यांनी केला.