महापौरपदाची लॉटरी आज निघणार

आठवड्याभरात ठरणार नवीन महापौर

पुणे – राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढतच असला तरी, राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या लॉटरीवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 27 महापालिकांमधील महापौर पदासाठीची आरक्षण सोडत बुधवारी मुंबईत मंत्रालयात निघणार आहे. महापौरपदाचे हे आरक्षण निश्‍चित झाल्यानंतर 21 नोव्हेंबरला महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

पुण्यासह राज्यातील 10 महापालिकांच्या महापौर आणि उपमहापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 14 सप्टेंबर 2019 ला संपुष्टात आला. त्याचवेळी राज्यातील विधानसभा निवडणुका असल्याने शासनाकडून या पदांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ती 21 नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे.

मात्र, एकिकडे ही मुदत संपत आली असतानाच राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कायम होता. त्यामुळे महापौरांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात होती. मात्र, शासनाच्या नगरविकास खात्याने महापौरपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अखेर जाहीर केला आहे. त्यानुसार नगरविकास खात्याचे प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.13) दुपारी 3 वाजता मंत्रालयामध्ये ही आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.

त्यामुळे पुढील अडीच वर्षांच्या कालावधी नक्‍की कोणत्या घटकाला महापौरपदाची संधी मिळणार हे स्पष्ट होईल. विद्यमान महापौर मुक्‍ता टिळक यांची मुदत 21 नोव्हेंबरला संपत असल्याने त्यापूर्वीच अथवा अखेरच्या दिवशी म्हणजेच 21 नोव्हेंबरला महापौरपदासह उपमहापौरपदाची निवडणूक होईल, असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.