पिंपरी-चिंचवडमधून अवघे 15 अर्ज : आचारसंहितेपाठोपाठ दिवाळी सुट्ट्यांचा परिणाम
पिंपरी – पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षकांचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी पिंपरी-चिंचवडच्या मतदारांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. पिंपरी व चिंचवडमधून प्रत्येकी चार, तर भोसरीतून सात अर्ज प्राप्त झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर जून 2020 दरम्यान होणाऱ्या पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पुणे पदवीधर मतदार संघात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यात शिक्षक मतदार जवळपास 60 हजार तर पदवीधर एक लाखापेक्षा जास्त मतदार नोंदणी होते. यापूर्वीच्या मतदारांची यादी सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे नव्याने नावनोंदणी करण्यासाठी 15 ऑक्टोबरपासून अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली. 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षकांचे अर्ज भरण्यासाठी पक्षांचे कार्यकर्ते, शिक्षक संघटना सक्रीय झाल्या आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या यामुळे मतदार नोंदणी कासवगतीने सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघातून अवघे चार, चिंचवडमधून चार आणि भोसरीतून सात अर्ज प्राप्त झाले आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर अर्ज येतील, असा दावा चिंचवड विधानसभेच्या पदनिर्देशित अधिकारी मनिषा कुंभार यांनी केला.
एकगठ्ठा अर्ज स्विकारण्याची गरज
पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी करण्याकडे पदवीधरांनी पाठ फिरविली आहे. यापूर्वी एकगठ्ठा नोंदणी अर्ज स्विकारले जात असल्याने नोंदणी होत आहे. यावेळी मात्र ज्या वक्तीचा अर्ज त्याने किंवा कुटूंब प्रमुखाने उपस्थित राहून अर्ज सादर करावेत, असा नियम आहे. केवळ मुख्याध्यापकांकडून त्यांच्या शाळेतील शिक्षक अथवा एखाद्या कुटुंबातील व्यक्तींकडून एकत्रित अर्ज आल्यास ते स्विकारले जात असल्याचा दावा पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे मतदार नोंदणीसाठी कोणीच उत्सुक नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे एकगठ्ठा अर्ज न स्विकारल्यास मतदार नोंदणी होण्याची शक्यता कमी आहे. एका बाजूला शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन आणि दुसऱ्या बाजूला कठीण नियम बनवून अडथळा निर्माण करण्याचा प्रकार बंद करण्याची गरज असल्याचेही पदवीधरांमधून व्यक्त होत आहे.
एकगठ्ठा मतदार नोंदणी अर्ज स्विकारु नयेत, केवळ मुख्याध्यापकांकडून त्यांच्या शाळेतील शिक्षक अथवा एखाद्या कुटुंबातील व्यक्तींकडून एकत्रित अर्ज आल्यास ते स्विकारले जात आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानोंदणी सुरू आहे.
– रेश्मा माळी, पदनिर्देशित अधिकारी