14 टेबलवर ; 28 फेऱ्या होणार
शिरुर (प्रतिनिधी)-शिरूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उद्या गुरूवारी (दि.24) कॉलेज रोडवरील कुकडी हॉलमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल असणार असून मतमोजणीच्या 28 फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीसाठी साधारणपणे अर्धा तासांचा कालावधी लागेल, असे निवडणूक निर्णय आधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी सांगितले.
निवडणूक मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी 90 हून आधिक अधिकारी व कर्मचारी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले की कुकडी हॉल, शिरूर येथे विधानसभा निवडणुकीच मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निकालानंतर काही अतिउत्साही तरुण मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून विरोधकांच्या घरासमोरून वाहन फिरवणे तसेच विरोधकांच्या दरवाजामध्ये फटाके वाजवणे, गुलाल उधळणे, घोषणा देणे अशी गैरकृत्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असे चुकीचे कृत्ये घडणार नाही, याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी.
पुंगळ्या काढून मोटरसायकल फिरवणाऱ्या चालक व मालक यांच्यावर कारवाई करून मोटरसायकल जप्त करण्यात येईल. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, मतमोजणीसाठी एक डीवायएसपी अधिकारी, चार पोलीस निरीक्षक, 15 पीएसआय, 100 पोलीस, 20 गृहरक्षक दलाचे जवान, 2 एसआरपीएफ, 1 रेल्वे सुरक्षा फोर्स प्लाटून असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.