निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांची माहिती
भोर (प्रतिनिधी) –भोर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी गुरुवारी (दि. 24) भोर येथे होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांनी दिली.
याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, भोर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 22 टेबलांवर 25 फेऱ्या होणार आहेत. सकाळी टपाली मतमोजणी होणार आहे. मतमोजणी करण्यासाठी 300 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे, असे राजेंद्रकुमार जाधव व अजित पाटील यांनी सांगितले.
मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व शांततेत होण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी सांगितले. भोर विधानसभा मतदारसंघात भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यांचा समावेश आहे. या मतदार संघात 3 लाख 60 हजार 254 मतदारांपैकी 1 लाख 25 हजार 609 पुरुषांनी, तर 1 लाख 17 हजार 57 महिलांनी, असे एकूण 2 लाख 27 हजार 367 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजविला आहे. त्यामध्ये 1 तृतीयपंथी मतदारही आहेत. या मतदारसंघात 62.91 टक्के मतदान झाले आहे.