कोथरूड – कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येथे मनसेच्या उमेदवाराला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या प्रचार फेरीत महाआघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे महाआघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने शिंदे यांच्याकडून मतदारसंघात घरोघरी पोहचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रविवारी शिंदे यांच्या प्रचारार्थ कर्वेनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी दुधाने, मनसे माजी नगरसेविका भाग्यश्री दांगट, कॉंग्रेसचे विभाग अध्यक्ष विजय खळदकर, स्वप्नील दुधाने, संजय नांगरे, कैलास दांगट, शैलेश जोशी, सचिन विप्र, सुरेखा मकवाना, अशोक कदम, उमेश कंधारे, आनंद पाटील आदी सहभागी झाले होते, तर या प्रचार फेरीदरम्यान, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांची शिंदे यांच्याशी भेट झाली. या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.