शशिकांत भालेकर
पारनेर – पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक वेगळ्याच वळणावर पोचली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी, भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. शिवसेनेच्या वतीने विद्यमान आमदार विजय औटी यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. परंतु नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी देखील उमेदवारी अर्ज नेला असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
या विधानसभा मतदारसंघात सध्या दुरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेच्या वतीने विद्यमान आमदार औटी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रवादीकडून देखील नीलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यांनी देखील उमेदवारी अर्ज नेला असल्याने ते येत्या काळात कोणती भूमिका घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ते अपक्ष उमेदवारी करतात किंवा कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सुजित झावरे यांनी देखील चार उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामुळे तालुक्यात वेगळ्याच घडामोडींना होत आहे का, याबाबत चर्चा सुरू आहे. त्यापूर्वी एक दिवस अगोदर खा. विखे व सुजित झावरे यांची सुमारे एक तासभर चर्चा झालेली आहे. त्यामुळे सुजित झावरे यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे का, अशा प्रकारची चर्चा तालुक्यामध्ये सध्या सुरू आहे.
सुजित झावरे यांनी तालुक्यामध्ये सेना-भाजप युती झाली, तर युतीच्या उमेदवाराबरोबर आपण जाऊ, पण कोणाचे उंबरे शिजवण्याची गरज कार्यकर्त्यांना नसणार, अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. त्यामुळे युती झाली तर सुजित झावरे हे शिवसेनेचे विजय औटी यांना पाठिंबा देतील, अशी शक्यता त्यावेळी वर्तविण्यात आली होती. परंतु त्याच वेळी त्यांनी सेना भाजप युती झाली नाही, तर आपण उमेदवारी करण्यासाठी तयार असल्याचे देखील सांगितले होते. त्यामुळे सध्यातरी सेना-भाजप युतीबाबत अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे काल खा. विखे व झावरे यांनी या मतदारसंघाबाबत काय चर्चा केली, याबाबत माहिती समजली नसली, तरी विधानसभा निवडणुकीबाबत पारनेरमधून खा. विखे हे वेगळ्या पर्यायाच्या शोधात असल्याचे समजते.
त्यामुळेच सुजित झावरे यांनी आपला अर्ज नेला असल्याचे कळते. त्यामुळे सुजित झावरे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतात का? त्याला खा. विखे यांचा पाठिंबा मिळतो का? पारनेरमधून तिरंगी लढत पाहायला मिळते का? अशा प्रश्नांना तालुक्यात ऊत आला आहे. ही खासदार विखे यांची खेळी असल्याचे देखील मानले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या देखील अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.