जामखेड – कर्जत व मिरजगाव येथील पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी विकास कामांच्या घोषणांचा पाऊस पडला. मात्र प्रत्यक्षात एकही काम समाधानकारक झाले नसल्याचा आरोप करत मिरजगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रोहित पवार यांना पाठिंबा दिला आहे.
तालुक्यातील झिक्री येथे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. या वेळी माजी जिल्हा परिषद परमवीर पांडुळे बोलत होते. या वेळी माजी सभापती नानासाहेब निकत, युवा कार्यकर्ते रमेश आजबे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक सचिन सोनमाळी, शिवकुमार सायकर, सूर्यकांत मोरे, अशोक घोडके, बबन देवकाते, विजयसिंह गोलेकर, श्याम कानगुडे, सुनील शेलार यांच्यासह मिरजगाव गटातील सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे अध्यक्ष, सदस्य आदी उपस्थित होते.
पांडुळे म्हणाले, भोसा खिंडीद्वारे सीना धरणात नियमित पाणी सोडू, असे आश्वासन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले होते. त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केला. कुकडीच्या हक्काचे ओव्हर फ्लोच्या पाण्याबाबत आमची घोर निराशा केली. धरणामध्ये पाणी न आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. तुकाई चारीचे पाणी खुल्या चारीऐवजी छोट्या बंद पाईपद्वारे दिले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळाले नाही. मिरजगाव येथे ट्रॉमा सेंटर, एमआयडीसीसह अनेक आश्वासने ना. शिंदे यांनी यांनी दिली. मात्र पूर्ण केली नाहीत. त्यामुळे आपण पवार यांना जाहीर पाठिंबा देत आहोत, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीत प्रवेश टाळला
परमवीर पांडुळे हे मागील जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेसकडून लढले. पण पराभूत झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत खा. सुजय विखे यांच्यासोबत राहिले. आता रोहित पवार यांना पाठिंबा दिला आहे. परंतु त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करण्याचे टाळले.