संकल्प मेळावा : तीस वर्षांपासून शेतकऱ्यांना होती प्रतीक्षा
पिंपरी – पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्यांना साडेबारा टक्के जमिनींचा परतावा देण्याचा गेली 30 वर्ष रखडलेला विषय आमदार महेश लांडगे यांच्यामुळे मार्गी लागल्याचे प्रतिपादन माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांनी केले. 106 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून आमदार लांडगे यांनी दिलेला शब्द पाळला असल्याचे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मोशी, डुडूळगाव आणि जाधववाडी परिसरातील कार्यकर्त्यांचा मोशीतील जय गणेश मंगल कार्यालयात भव्य संकल्प मेळावा बुधवारी (दि. 25) पार पडला. यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका अश्विनी जाधव, सारिका बोऱ्हाडे, सुवर्णा बुर्डे, साधना मळेकर, स्वीनल म्हेत्रे, नगरसेवक वसंत बोऱ्हाटे, लक्ष्मण सस्ते, सागर हिंगणे, रवी जांभूळकर, माजी उपसरपंच विठ्ठल कामठे, बबनराव बोऱ्हाटे, विजय सस्ते, मंगल आल्हाट, विश्राम कुलकर्णी, सुरेश तळेकर, चंद्रकांत तापकीर, सतीश जरे, संतोष राठोड, नितीन आहेर, निखील बोऱ्हाडे, राहुल रस्ते, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय बैलगाडा संघटना, भोसरी फार्मासिस्ट असोसिएशन यांनी आमदार लांडगे यांना यावेळी पाठिंबा जाहीर केला.
पुढे बोलताना बोऱ्हाडे म्हणाले, प्राधिकरणाने 1972 ते 1983 दरम्यान थेरगाव, रहाटणी, वाल्हेकरवाडी, काळेवाडी, निगडी, आकुर्डी, भोसरी अशा दहा गावांमधील जमिनी संपादित केल्या होत्या. शासनाकडून नियमानुसार साडेबारा टक्के जमिनीचा परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु तो देण्यास प्राधिकरणाकडून विलंब केला जात होता. आमदार महेश लांडगे यांनी शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमिनीचा परतावा मिळावा, यासाठी पाठपुरावा केला. विधानसभेत जोरदार आवाज उठवला.
नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी प्राधिकरण बाधित नागरिकांना सिडकोच्या धर्तीवर भरपाई देण्याबाबत राज्यसरकार सकारात्मक असल्याचे सभागृहात सांगितले. यानंतर आमदार लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने सोमवार दि. 1 जुलै 2019 रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाशी संबंधित विषयांवर महत्वपूर्ण बैठक झाली. तेव्हा प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीनुसार मूळ शेतकऱ्यांना सहा टक्के जागा आणि सहा टक्के चटई निर्देशांक या स्वरूपात परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोऱ्हाडे यांनी सांगितले.
आमदार महेश लांडगे म्हणाले, त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून मी भोसरी विधानसभेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर आपण माणसे जोडण्याचे काम करायचे आहे. माझे कार्यकर्ते माणसे जोडण्याचे काम करत आहेत. आमच्यासोबत असणाऱ्या नागरिकांच्या परिवाराचा आमच्यावर विश्वास आहे. आजपर्यंत एक टक्काही कोणाचे नुकसान झाले नाही. कोणाचे कधीच वाईट करत नाही. प्रतिकूल परिस्थितीत साथ देणाऱ्यांसोबत मी कायम असल्याची ग्वाही लांडगे यांनी यावेळी दिली.