पुणे – दी महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्स फेडरेशन, मुंबई हे दरवर्षी महाराष्ट्रातील सहकारी बॅंकांनी केलेल्या कामकाजाच्या आधारावर सहकारी बॅंकांना पुरस्कार देऊन सन्मानित करत असते. यामध्ये पुणे येथील राजर्षि शाहू सहकारी बॅंकेस रु. 500 ते 1000 कोटींच्या ठेवी गटामध्ये राज्यस्तरीय पातळीवरील सन 2018-19 चा सर्वोत्कृष्ट बॅंकेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
पुरस्कार राज्य सहकार निवडणूक आयुक्त डॉ. जगदीश देविदास पाटील व दी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅंक्स फेडरेशनचे अध्यक्ष बाळासाहेब अनास्कर यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारतेवेळी बॅंकेचे संचालक दिलीपभाई शिंदे, शांताराम धनकवडे, बाळासाहेब जगताप, पद्माकर पवार, अभय मोहिते, सचिन पन्हाळे, सतीश नाईक तसेच बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पासलकर उपस्थित होते.
बॅंकेने या अगोदरही सलग आठ वर्षे राज्यस्तरीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट बॅंक पुरस्कार हॅट्रिकसह सलगरित्या मिळविलेले आहेत. सन 2018-2019 चाही तृतीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बॅंक पुरस्कार बॅंकेने मिळविला असून राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बॅंक पुरस्काराची परंपरा बॅंकेने सलग नवव्या वर्षीही कायम ठेवलेली आहे, असे राज्यस्तरीय पातळीवरील सलग नऊ वर्षे पुरस्कार मिळवणारी राजर्षि शाहू सहकारी बॅंक पुणे ही महाराष्टृ राज्यातील एकमेव सहकारी बॅंक आहे. आज रोजी बॅंकेच्या एकूण ठेवी रु.810 कोटी आहेत, तर रु.551 कोटीचे कर्जवाटप बॅंकेने केले आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये सर्व तरतूदी करून तसेच आयकर भरून बॅंकेस निव्वळ नफा रु.8 कोटी 30 लाख झाला आहे. बॅंकेचा ग्रॉस एनपीए 2.97% असून नेट एनपीए 0 टक्के आहे.