सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सत्तेचे वाटप करा

दिलीप वळसे : पक्षाचा आमदार नसलेल्या मतदारसंघांत आता पालक आमदार

नगर – विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याला पक्षाला चांगले यश मिळाले. या यशात सामान्य कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असल्याने यापुढे जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकार संस्थांच्या निवडणुकीत या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सत्तेचे वाटप करा, तसेच जिल्ह्यातील पक्षाच्या सहाही आमदारांनी तालुका, मतदारसंघ म्हणून काम न करता जिल्हा म्हणून कामे करावे.ज्या तालुक्‍यात पक्षाचा आमदार नाही, त्या ठिकाणी पालक आमदार नियुक्‍त केला जाणार असून त्या आमदाराने या तालुक्‍यातील देखील प्रश्‍न सोडवावेत, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे यांनी आज येथे केले.

जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने येथील राष्ट्रवादी भवन या पक्षाच्या कार्यालयात नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी वळसे बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. यावेळी पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आमदार अरूण जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार प्राजक्‍त तनपुरे, आमदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले,अशोक भांगरे, नरेंद्र घुले, पांडूरंग अभंग, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, बाबासाहेब भोस, संदीप वर्पे आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर आता आमच्याशिवाय कोणीच नाही. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर विधानसभेच्या निवडणुकीत बारा विरुद्ध शून्य असा निकाल लावू अशी वल्गना करणाऱ्यांमध्ये गर्व झाला होता. परंतु निकालानंतर 12 पैकी 9 जागा महाविकास आघाडीने जिंकल्यानंतर त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला,अशी टीका माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता वळसे यांनी केली. ते म्हणाले की, विरोधी पक्ष बसण्याची मानसिकता झाली होती.

पण राजकारणात काही घडू शकते. त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहण्याचा संयम असावा लागतो. कालपर्यंत विरोधकाची भूमिका पार पाडणार असे वाटप असताना आता सत्तारुढ झालो आहे. त्यामुळे आमदारांकडे लोकांच्या अपेक्षा वाढणार आहेत. नव्याने निवडून आलेल्या आमदारांनी सभागृहात पूर्णवेळ द्या. सभागृहात आपली चुणूक दाखवावी. तर कामे होतील. त्याबरोबर पक्षाच्या सहाही आमदारांनी तालुक्‍यात, जिल्हा न पाहता राज्य म्हणून काम करावे. जिल्ह्यातील प्रश्‍नांसाठी एकत्रित यावे, पक्षबांधणीला मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.

पक्षनिरिक्षक अंकुश काकडे म्हणाले, आमदारांचा विजय हा शरद पवारांच्यामुळे झाला आहे. हे विसरता कामा नये, पक्ष अडचणीत असतांना पक्षाकडे व पवारांकडे पाठ फिरविली. त्यामुळे त्यांच्याकडे मतदारांनी देखील पाठ फिरविली. आता पक्षात येण्याची भाषा करीत आहे. पण त्यांना अजिबात पक्षात घेवू नका असे ते म्हणाले. पक्षात काम न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. नावाला पदे घेतली जात आहे. अशांवर कारवाई करण्याची मागणी काकडे यांनी केली.

आ.डॉ. लहामटे म्हणाले, मी पक्ष आणि देशासाठी यापुढे काम करणार असून 65 मतदारसंघात आदिवासी समाज आहे. या सर्व मतदारसंघात पक्ष पोहोचविणार. शिवसेना व भाजपपेक्षाही राष्ट्रवादीत जिव्हाळा जास्त. आ.लंके म्हणाले, लोकवर्गणी करून निवडून येणार मी आमदार झालो. ज्या पक्षाच्या प्रमुखाने मला पक्षाकडून काढून टाकले होते. त्यांचे बहुमत माझ्या मताने सिद्ध झाले. आ. जगताप म्हणाले, सहाही आमदार जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून काम पाहणार आहे. एकत्रित व जिद्दीने काम केले तर पुढील निवडणुकीत बाराही जागा पक्षाला मिळतील. यावेळी राजेंद्र फाळके, मंजुषा गुंड, संदीप वर्पे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन संजय कोळगे यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.