पुणे – पुण्यातील आघाडीच्या जागावाटपाबाबात अद्याप वरिष्ठ नेत्यांनी कळवले नाही. प्रदेशाध्यक्ष जागा वाटपाबाबतीची अधिकृत घोषणा करतील, असे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी झाली, त्यानंतर बागवे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे आदी उपस्थित होते. जागा वाटपाच्या निर्णयाबाबत दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहेत. याबाबतीची माहिती दोन्ही प्रदेशाध्यक्ष एकत्रित जाहीर करतील, असे बागवे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात पक्षाचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील जागावाटपाबाबतची घोषणा केली. यानंतर कॉंग्रेसमधील काही नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता. त्याविषयी बागवे म्हणाले, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आघाडी धर्म पाळतील. रविवारी झालेल्या बैठकीमध्ये निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आले. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची एक कोअर कमिटी करण्यात येणार आहे.
युतीच्या विरोधात आम्ही लढत असल्यामुळे प्रचार यंत्रणा, सभा यांचे नियोजन एकत्रित पद्धतीने करण्यात येणार आहे. समाजमाध्यमांसाठी एकच वॉर रुम तयार करण्यात येणार असल्याचे तुपे यांनी सांगितले.