पिंपरी – विमा पॉलिसीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून अडीच लाख रुपये घेऊन विमा एजंट पती पत्नी पसार झाले. या प्रकरणी रविवारी (दि. 8) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मनोहर बाबुराव वाघमारे (वय 57, रा. शिवाजी चौक, हिंजवडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जयवंत जगन्नाथ सावंत (वय 41) व त्याची पत्नी श्रद्धा जयवंत सावंत (वय 34, रा. अभिनव कॉलेज जवळ, आंबेगाव बुद्रुक) अशी फसवणुकीचा गुन्हा झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी पती-पत्नी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये फिर्यादी मनोहर यांना जीवन समृद्ध विमा पॉलिसीची माहिती सांगितली. तसेच अडीच लाख गुंतवणूक केल्यास पाच वर्षांनंतर दुप्पट पैसे आणि एक दुचाकी मिळणार असल्याचे सांगून अडीच लाख रुपयांची फसवणूक केली.