मुंबई : कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गुरुवारी ईडीच्या कार्यालयात चौकशी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही अनुचित प्रकार करू नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत. या नोटिशीत कोणत्याही कृत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास संबंधित व्यक्तीस जबाबदार धरून आपणाविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे पूत्र व कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी तसेच त्यांचे तत्कालीन भागीदार राजन शिरोडकर यांच्या मागचे ईडीच्या चौकशीचे सत्र अजूनही संपलेला नाही. बुधवारी त्यांची पुन्हा आठ तास कसून विचारणा करण्यात आली तर सोमवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. कोहिनूर स्क्वेअर टॉवर प्रकल्पाच्या प्रारंभापासून करण्यात आलेला व्यवहार आणि त्यासंबंधीच्या दस्तऐवजांबाबत या दोघांकडून सविस्तर माहिती घेतली जात आहे. त्यासाठी जोशी व शिरोडकर यांना एकत्र तसेच स्वतंत्र बसून विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.