सणवार व निरुत्साह 

विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही, वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागला. वेताळ म्हणाला, राजा एक गोष्ट सारखी खटकते आहे, ऐक. पण ती संपेपर्यंत तू मध्ये बोलणार नाहीस. जर तू मध्येच बोललास तर मी पुन्हा झाडांवर पळून जाईल. वेताळ सांगू लागला- 

“आता नुकताच रक्षाबंधन सण साजरा झाला. मला आठवते की पूर्वी भाऊराया बहिणीस घेण्याकरता चार दिवस आधीच यायचा. मग नागपंचमी असो, मंगळागौर असो संपूर्ण वातावरण उत्साहाचे असायचे. हाच सण नाही तर गणपती, दसरा, दिवाळी सर्व पारंपरिक सणवार उत्साहाने साजरे केले जायचे. दिवाळीची घाई तर विचारूच नका. कापड चोपड खरेदी, दागदागिने खरेदी. एवढेच नाही तर एकेक दिवसाचे सण देखील उत्साहाने साजरे होत. जसे गुढीपाडवा, बैलपोळा, संक्रांत, जन्माष्टमी. नेहमीचे घरातील कुळाचार जसे श्रावणी शनिवारचा ब्राह्मण, संक्रांतीचे व चैत्राचे हळदीकुंकू. अगदी यथायोग्य व त्याच दिवशी साजरे केले जायचे.

आजही सणवार जरी तेथेच दिसले तरी त्यातील उत्साह मात्र खूपच कमी झालेला दिसत आहे. पूर्वी लोकांची आर्थिक स्थिती कमकुवत होती, आता लोकांकडे पैसाही खेळत आहे परंतु उत्साह मात्र नाही हे असे का?’ यावर विक्रम म्हणाला, “हे वेताळा पूर्वीचे जीवन हे धकाधकीचे नव्हते. म्हणजे उद्योग नव्हता. त्यामुळे बहुतेक सर्व शेतीवर अवलंबून असत. आता रक्षाबंधनाचेच उदाहरण घे ना. त्यावेळी शेतीची लावणीची कामे संपल्याने भाऊरायाही आवडीने बहिणीला घ्यायला जायचा. नवीन कपडे व दागदागिने फक्‍त सणवारी किंवा अगदी घरचे लग्नकार्य वगैरे असेल तरच घेतले जायचे. एकत्र कुटुंब असल्याने हळदीकुंकू, ब्राह्मण जेवण, कुठे श्राद्ध, तिथी सर्व पार पाडले जात असे.

आता प्रचंड कारखानदारी आली आहे, व्यवसाय आले आहेत. या व्यवसायात प्रचंड नोकरवर्ग कामाला आहेत. त्यामुळे त्यांच्या हाती रोख पैसा येत आहे. आता लोकसंख्या व शिक्षण वाढल्याने लोकांना हवा तसा रोजगार मिळत नाही. अतिशय हुशार कुठेही जाऊ शकतात; पण सामान्य लोकांची परिस्थिती भयानक असून रोजगार मिळणे कठीण झाले आहे. मिळालेली नोकरी सांभाळणे कठीण आहे. हवी तेव्हा सुट्टी मिळू शकत नाही. तसेच आजकाल फराळ, कपडे, दागदागिने हवे तेवढे केव्हाही मिळू शकत असल्याने त्यांचे अप्रूप कमी झालेले आहे. म्हणूनच एकंदर उत्साह कमी आहे. रक्षाबंधन, भाऊबीज, ब्राह्मण जेवण जो तो आपापल्या सोयीनुसार आता करू लागले आहेत नव्हे उरकू लागलेत.

पुढे कदाचित हेही ऐकशील की ब्राह्मण, सवाशीण हॉटेलमध्ये घातली जात आहे. हॉटेलांकडून एक कूपन मिळेल व ते कूपन आपल्याला ज्याला भोजनास घालावयाचे आहे त्यास द्यायचे. मग ती व्यक्‍ती हॉटेलमध्ये गेल्यावर यथायोग्य स्वागत होऊन योग्य प्रमाणे भोजन देऊन त्याला दक्षिणाही दिली जाईल. हे ऐकताच वेताळ मनापासून हसला व म्हणाला, “कालाय तस्मै नम: पण राजा तू बोललास त्यामुळे हा मी निघालो.’ असे म्हणून वेताळ प्रेतासह पुन्हा पिंपळाच्या झाडावर जाऊन लोंबकळू लागला.

उत्तम पिंगळे 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.