पिंपरी – शहरातील वाढती कचरा समस्या लक्षात घेता मोशी येथील कचरा डेपोची जागा भविष्यात अपुरी पडू शकते. ही बाब लक्षात घेऊन पुनावळे येथील राज्य सरकारच्या वन विभागाच्या ताब्यात असलेली 22 हेक्टर इतकी जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला आहे. संबंधित जागेचा लवकर ताबा घ्यावा, असे पत्र अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी बुधवारी (दि. 29) नगररचना उपसंचालकांना दिले.
शहरामध्ये सध्या दररोज 950 टन इतका कचरा निर्माण होत आहे. शहरात दरवर्षी कचऱ्यामध्ये 10 टक्के वाढ गृहीत धरली तर पुढील पाच वर्षात या समस्येची व्यापकता वाढत जाणार आहे. सध्या महापालिकेकडून मोशी येथील यांत्रिकी खत निर्मिती प्रकल्पाद्वारे 450 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पात 30 टन कचऱ्यावर तर, प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती या प्रकल्पाद्वारे 5 टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे. उर्वरित कचरा सॅनिटरी लॅंडफिलद्वारे जिरवला जात आहे. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, “”पुनावळे येथील कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे पत्र नगररचना उपसंचालकांना बुधवारी दिले आहे.
कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्न सुटेल.” महापालिका पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, “”महापालिकेकडून सध्या कचऱ्यापासून वीज निर्मिती हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संबंधित प्रकल्पातंर्गत कचऱ्याचे यांत्रिकी पद्धतीने विलगीकरण करण्यात येत आहे. तसेच, प्रकल्पासाठी आवश्यक विविध परवानग्या घेण्याचे काम सुरू आहे.”