पिंपरी – पीएमपी बसमध्ये सुट्ट्या पैशावरून झालेल्या वादात महिलेसह तिच्या नातेवाईकांनी बस चालक व वाहकाला मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. २८) तळेगाव दाभाडे येथे घडली.
नवनाथ व्यंकटराव ढगे (वय २८, रा. मोई, ता. खेड) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून महिला व तिचे दोन पुरुष नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी आणि बस वाहक यांच्यात तिकिटाच्या सुट्ट्या पैशावरून वाद झाला होता.
यावेळी महिलेने पोलिसांकडे बसचे वाहक व चालक यांनी गैरवर्तणूक केली. तसेच, त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले, अशी तक्रार दिली होती. तर बसचालक ढगे यांनीही परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. आरोपी महिला ही बसमध्ये पुढच्या दरवाज्यातून चढली. तिने सुट्ट्या पैशावरुन वाहकाशी वाद घातला. यावेळी तिने फिर्यादी यांना तुमची लायकी काय आहे माहिती आहे, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
फिर्यादी यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली असता ती अंगावर धावून आली. तिने मोबाइल हिसकावून घेत फिर्यादीच्या हाताचा चावा घेतला. या घटनेनंतर फिर्यादी यांनी बस पोलीस ठाण्यात नेण्यासाठी चालू केली. महिलेने तिच्या इतर नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले. तिच्या नातेवाईकांनी बस अडवून फिर्यादी व वाहकाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.