वडगाव – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मावळ विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्रालयात गुरुवार (दि. १) बैठक झाली. त्यात मावळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती देण्याविषयी चर्चा झाली.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार सुनिल शेळके आदी उपस्थित होते. बैठकीत मावळातील विकासकामे, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची सद्यःस्थिती व पुढील कार्यवाही यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळातील प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना दिल्या. यात एकविरा देवी मंदिर परिसर विकास आराखडा व रोप-वे उभारणे कामास गती देण्यासाठी वन विभाग व पुरातत्व विभागाच्या संपूर्ण परवानग्या दोन महिन्याच्या आत घ्यावी.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी कार्ला ते देहूरोडदरम्यान आवश्यक असलेल्या आठ ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठीच्या प्रस्तावाला एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.
जांभूळ येथे क्रीडा संकुल उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर केलेला असून तालुकास्तरीय अद्ययावत क्रिडा संकुल उभारण्यासाठी तात्काळ मान्यता द्यावी. तसेच ग्लास स्कायवॉक प्रकल्पाचा संपूर्ण विकास आराखडा राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.