मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांची आमदार नवाब मलिक यांनी आज भेट घेतली. अजित पवारांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर या दोन नेत्यांची बैठक झाली. यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान मलिक हे देवगिरीवर दाखल झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात मलिक यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते सत्ताधारी बाकांवर बसले. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली असल्याची चर्चा सुरू झाली होती.
तर, दुसरीकडे मलिक हे सत्ताधारी बाकांवर आल्याने विरोधी पक्षांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले होते. मलिक यांना अटक झाली तेव्हा भाजपने त्यांचे कृत्य देशद्रोही असल्याचे म्हणत त्यांच्या अटकेच्या कारवाईचे समर्थन केले होते. तर, शिवसेनेत फूट पाडल्यानंतर शिंदे गटानेदेखील उद्धव ठाकरे यांनी मलिकांबाबत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते.