नाशिक – नाशिक जिल्ह्यात सध्या बिबट्यांचा वावर वाढत आहे. मंगळवारी सकाळी मखमलाबाद परिसरातील महाले मळ्यात मृत अवस्थेत बिबट्या आढळला. मृत बिबट्याचा पंचनामा करून त्यास शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मखमलाबाद परिसरातील गंगापूर कॅनॉल, जुना चांदशी रस्त्यावरील काकड मळे परिसर, महाले मळा आदींसह नाशिकच्या काही भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे.
या भागातील अनेक कुत्री , वासरू, गायींचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाला आहे. मळे भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या महिन्यात सिडको, नाशिकरोडसह अन्य काही परिसरात वनविभागाने बिबटे जेरबंद केले आहेत. मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वी जुना चांदशी रस्त्यावरील काकड मळे परिसरात तानाजी काकड या शेतकऱ्याच्या वासराचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाला होता.
त्यानंतर रविवारी मध्यरात्री याच रस्त्यावरील थोरात मळ्यातील दीपक थोरात यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला केला. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.