हर्षद कटारिया
सहकारनगर – सिंहगड रस्त्यावर पु.ल.देशपांडे उद्यानालगत दररोज शकडो लिटर पिण्याचे स्वच्छ पाणी नाल्यात वाहून जात आहे. जनता वसाहत येथील स्थानिक नागरिकांनीही येथे गेली 15 वर्षांपासून हे पाणी वाहत असून ते कुठून येते हे माहिती नाही, असे सांगितल्याने पाण्याची गळती होते की सोडले जाते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत “प्रभात’मध्ये वृत्त प्रकाशित होताच याची दखल आजी, माजी नगरसेवकांसह आमदारांनी घेत सदर पाण्याची नासाडी तातडीने थांवावी, अशी सूचना पाटंधारे तसेच महापालिका प्रशासनाला केली आहे.
जनता वसाहतमधून मोठ्या पाइपमधून येणारे हे शेकडो लिटर पाणी पुढे दत्तवाडी येथील नाल्यातून वाहते. सदर प्रकार “प्रभात’ने उघडकीस आणला. पुणे महापालिका धरणांतून अधिक पाणीसाठा उचलते, अशी ओरड जलसंपदा विभागाकडून होत असताना शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, अशी सूचना दिली जात असताना एकीकडे अशा प्रकारे शेकडो लिटर पाणी दररोज वाहून जात असल्याने याची जबाबदारी घेण्यासही पाटबंधारे विभाग, मनपा तयार नसल्याने आजी, माजी नगरसेवकांसह आमदारांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिकेत समाविष्ट 34 गावांना पाणी पुरवठ्यासाठी 2.36 टीएमसी अधिक पाण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि अशा पद्धतीने पाणी वाया घालविले जात आहे.
पाणी वाया जाते.., याचा हिशेब काय?
पुणे शहराला 2023-24 वर्षासाठी सुमारे 20.90 टीएमसी पाणी मागणीचे अंदाजपत्रक मनपा प्रशासनाने जलसंपदा विभागास सादर केलेले असताना या मागणीला केराची टोपली दाखवित विभागाने 12.82 टीएमसी पाणीसाठा मंजूर केला. मागणी असतानाही पाणी नाकारले जात असताना पाटंधारे विभाग आणि मनपाकडून अशा ठिकाणी पाणी वाया जावू दिले जाते, याचा हिशेब काय?
“पु.ल.देशपांडे उद्यान शेजारी असलेल्या पाण्याचा स्रोत जाणून घेण्यात अधिकारी उदासीन आहेत, त्यामुळे पाटंधारे विभाग व मनपा पाणीपुरवठा विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करून दोन्ही प्रशासनाचा समन्वय होऊन पाण्याचा अपव्यय थांविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ” – माधुरी मिसाळ, आमदार, पर्वती मतदारसंघ
“सदरचा पाण्याचा स्रोत नैसर्गिक आहे की कृत्रिम याचा शोध घेणे महत्वाचे आहे. नैसर्गिक असल्यास त्या पाण्याचा नक्कीच वापर होऊ शकतो. आणि कृत्रिम असल्यास कालव्याला की मनपा पाण्याचा लाईनला गळती आहे हे शोधून लाखो लिटर वाया जाणारे शुद्ध पाणी गळती ताबडतोब थांबिविणे गरजेचे आहे.” – अभिजित बारवकर, सामाजिक कार्यकर्ता