सातारा – कै. लालसिंगराव काका व भैय्यासाहेबांचे स्वप्न असलेला प्रतापगड साखर कारखाना हा कायमस्वरूपी सुरू व्हावा, अशी तमाम जावळीकरांची इच्छा होती आणि आहे. अजिंक्यतारा कारखान्याच्या मदतीने प्रतापगड सुरू केला आहे. प्रतापगड कारखाना “अजिंक्यतारा’च्या मालकीचा नाही. सर्वांच्या सहकार्याने हा कारखाना कर्जमुक्त होऊन आर्थिक सक्षम होईल आणि जावळीकरांच्याच मालकीचा होईल. मात्र त्यासाठी जावळीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस प्रतापगडलाच घातला पाहिजे. यावर्षी चार लाख टन उसाचे गाळप करायचे असून सभासद- शेतकऱ्यांच्या सहकार्याने प्रतापगड सक्षमपणे उभा करू, असा विश्वास अजिंक्यतारा- प्रतापगड उद्योगाचे मार्गदर्शक, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
प्रतापगड कारखान्याच्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगडचे चेअरमन सौरभ शिंदे, व्हाइस चेअरमन ऍड. शिवाजीराव मर्ढेकर, मार्गदर्शक सुनेत्रा शिंदे, अजिंक्यताराचे चेअरमन यशवंतराव साळुंखे, व्हाइस चेअरमन नामदेव सावंत, लालसिंगराव शिंदे पतसंस्थेच्या चेअरमन अंकिता शिंदे, सातारा बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, जावळी बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, पंचायत समितीच्या माजी सभापती अरुणा शिर्के, माजी उपसभापती हनुमंतराव पार्टे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे, तानाजी शिर्के, आनंदराव कणसे, शोभाताई बारटक्के, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
वसंतराव मानकुमरे म्हणाले, प्रतापगडवर अनेक संकटे आली. संघर्ष करावा लागला. मात्र आता आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मदतीने अजिंक्यतारा प्रतापगडच्या मदतीला धावून आला आहे. आपला हक्काचा प्रतापगड सुरू होत आहे. शेतकऱ्यांनी या कारखान्याला सहकार्य करावे. सौरभ शिंदे म्हणाले, अजिंक्यताराच्या मदतीने प्रतापगडवर पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरंतर अजिंक्यतारा त्यांचं कार्यक्षेत्र नसले तरी जावळीतल्या शेतकऱ्यांचा ऊस नेत होते. आता आपला प्रतापगड सुरू झाला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करून आपला कारखाना टिकवणे गरजेचे आहे. यावेळी शिवाजीराव मर्ढेकर यांचेही भाषण झाले. नामदेव सावंत यांनी आभार मानले. प्रतापगड कारखान्यावर शिवाजीराव मर्ढेकर व सौ. छाया मर्ढेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते बॉयलरमध्ये मंत्रोच्चारात अग्नी प्रज्वलित करण्यात आला.