सातारा – कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथे येत्या 16 नोव्हेंबरला होणाऱ्या 34 व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांची निवड झाली. साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू यांनी ही घोषणा केली.
ज्येष्ठ पत्रकार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे प्रमुख कार्यकर्ते डॉ. विजय चोरमारे यांनी सातारा येथील बेडकीहाळ यांच्या मैत्री या निवासस्थानी भेट घेऊन किशोर बेडकिहाळ यांचे अभिनंदन केले व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी या संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कवी प्रमोद मनोहर कोपर्डे, सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार दिनकर झिंब्रे व अजिंक्य चोरमारे यावेळी उपस्थित होते. किशोर बेडकिहाळ महाराष्ट्रातील प्रबोधक, चिकित्सक, सखोल अभ्यासक व परखड वक्ते आहेत.
गेल्या वर्षी फलटण येथे पार पडलेल्या दहाव्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. ते समाज प्रबोधन पत्रिकेचे माजी संपादक तसेच ‘नवभारत’ या वैचारिक त्रैमासिकाचे माजी संपादक सदस्य होते. त्यांचे पंडित नेहरु आणि सेक्युलॅरिझम , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक मागोवा हे ग्रंथ प्रकाशित आहेत. बदलता महाराष्ट्र, भारतीय राजकीय व्यवस्था: प्रक्रिया आणि स्वरूप, विचारवेध संमेलन अध्यक्षीय भाषणाचे खंड, शतकांतराच्या वळणावर (विचारवेध संमेलनातील निवडक निबंध संग्रह), परिवर्तन विचार चिंतन आणि चिकित्सा, सारीपाट आणि गुलाल, चौकटीबाहेरचे चिंतन, वेध नेहरु विचार विश्वाचा आदी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले आहे. ज्येष्ठ विचारवंत नेते डॉ. एन .डी .पाटील यांच्या प्रदीर्घ मुलाखतीचे पुस्तक लोकवाड्.मय प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले आहे.