कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – अमेरिकेच्या मरिन कॉर्प्सचे एक विमान ऑस्ट्रेलियामध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये तीन सैनिक ठार झाले, तर किमान 20 जण जखमी झाले आहेत. बहुराष्ट्रीय लष्करी प्रशिक्षणादरम्यान ही दुर्घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाच्या मेलविले बेटावर हे विमान कोसळले. विमानात 23 जण प्रवास करत होते. विमानातील 23 जणांना डार्विन शहरापासून 80 किलोमीटर अंतरावरच्या रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या विमानाच्या अपघातामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
ही दुर्घटना झालेले ठिकाण अत्यंत दुर्गम असल्याने विमानाचा अपघात झाल्यानंतर तेथे पोहोचून मदत उपलब्ध करण्यासाठी बराच वेळ गेला होता. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, फिलिपाइन्स आणि पूर्व तिमूरच्या सैन्याचा “प्रिडेटर्स रन’ हा संयुक्त लष्करी सराव सुरू असताना ही दुर्घटना घडली.
या विमानामध्ये केवळ अमेरिकेचे सैनिक होते, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍन्थनी अल्बानीज यांनी सांगितले. मेलाविले बेटावर सुरू असलेल्या या लष्करी सरावामध्ये सर्व देशांचे मिळून 2,500 सैनिक सहभागी झाले आहेत.