पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. त्यानुसार जुलै- ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांना वाढीव शुल्काचा भार सोसावा लागणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क ४७० रुपये, प्रशासकीय २० रुपये, गुणपत्रिका लॅमिनेशन २० रुपये, प्रमाणपत्र २० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा (शास्त्र विषय) १० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा (तंत्र विषय) १०० रुपये, खासगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (माहिती पुस्तिकेसह) १३० रुपये, खासगी विद्यार्थी नोंदणी १ हजार २१० रुपये आकारले जाणार आहे. पूर्वी परीक्षा शुल्क ४२० रुपये एवढे होते. आता ५० रुपयांनी वाढवले आहे.
पुनर्परीक्षार्थी व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्काचा तपशील मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. श्रेणी सुधारण्यासाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कातही वाढ केल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.