मुंबई- सर्वसामान्यांना बसणारी महागाईची झळ काही कमी होत नाही. मुंबईत 1 सप्टेंबरपासून एक लीटर म्हशीचे सुटे दूध रिटेलमध्ये 2 ते 3 रुपयांनी महागणार आहेत. होलसेल दरातही 2 रुपयांनी वाढ होणार आहे. शनिवारी दूध विक्रेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या दरात वाढ झाली असून, त्याचा परिणाम दूध उत्पादकांवर होत आहे. त्यामुळे याचा परिणाम आता दूधाच्या दरावरही होणार आहे. सध्या म्हशीच्या सुटे एक लीटर दूधाचा दर 85 रुपये आहे. हा दर आता 87 रुपये होईल, तर रिटेलला हे दूध 87 ते 88 रुपये होईल.
मुंबई शहरात तीन हजाराहून अधिक दूध विक्रेते आहेत. जे ब्रॅन्डेड किंवा पॅकेटबंद दूध नसते, ज्याची विक्री सुट्या पद्धतीने केली जाते अशा दुधाच्या किमतीत वाढ होणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचे भाव वाढले आहेत. चाऱ्याच्या दरात वाढ झाल्याने याचा परिणाम दूध उत्पादकांवर होत आहे.
अर्धा पावसाळा संपत आला पण राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला नाही. पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम हा जसा शेतीवर झालाय तसाच दुग्धव्यवसायावर देखील झाला आहे. अनेक भागात चारा टंचाईला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागात श्रावण महिना सुरू झाला तरी पावसाने दांडी मारल्याने ऊस, मका पिकासह अन्य पिकेही काही प्रमाणात धोक्यात आली आहेत. त्यामुळे याचा परिणाम दूध व्यवसायावर होत आहे.