नवी दिल्ली – इजिप्तच्या कैरो हवाई तळावर आजपासून 16 सप्टेंबरदरम्यान होत असलेल्या ब्राईट स्टार-23 या द्वैवार्षिक बहुस्तरीय त्रिसेवा युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय वायुदलाची तुकडी रवाना झाली आहे.
भारतीय वायुदल पहिल्यांदाच ब्राईट स्टार-23 मध्ये सहभागी होत असून, यात अमेरिका, सौदी अरेबिया, ग्रीस आणि कतारच्या तुकड्याही सहभागी होत आहेत. भारतीय वायुदलाच्या तुकडीत पाच मिग-29, दोन आयएल-78, दोन सी-130 आणि दोन सी-17 विमानांचा समावेश आहे. भारतीय वायुदलाच्या गरुड विशेष दलाचे जवान तसेच 28, 77 78 आणि 81 या तुकड्यांमधील जवानही या युद्धसरावात सहभागी होत आहेत. भारतीय लष्कराचे दीडशे जवानही या सरावात सहभागी होण्यासाठी गेले आहेत.
भारत आणि इजिप्तमध्ये या आधीही 1960 दरम्यान दोन्ही देश हवाई इंजिनाचा आणि विमानाचा विकास करत असताना विशेषत्वाने संबंध आणि प्रगाढ सहकार्य प्रस्थापित झाले होते. त्यावेळी इजिप्तच्या वैमानिकांना भारतीय समकक्ष वैमानिकांनी प्रशिक्षणही दिले होते.