बंगळूरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला परदेश दौरा आटोपून इस्रोच्या चांद्रयान टीमची बंगळूरुमध्ये आज सकाळी भेट घेतली. यावेळी त्यांनी इस्रोच्या चांद्रयान टीमचे आणि सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी,”मी तुम्हाला भेटण्यास उत्सुक होतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यला देखील सलाम केला आहे. ‘हा भारताच्या विज्ञान सामर्थ्याचा शंखनाद असून देशाला अभिमान वाटावा असा हा क्षण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी हे त्यांचा ग्रीसचा दौरा आटोपून थेट इस्रोच्या शास्रज्ञांच्या भेटीला गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोमध्ये बोलताना सर्व शास्रज्ञांचे अभिनंदन केले. तसेच, असे प्रसंग फार दुर्मिळ असतात, असेही मोदी म्हणाले. “तुम्हा सर्वांमध्ये येऊन आज मला वेगळाच आनंद होत आहे. असा आनंद फार दुर्मिळ प्रसंगी मिळतो”, असे मोदी यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी मोदींनी केलेल्या मिश्किल टिप्पणीवर समोरच्या शास्रज्ञांमध्ये हास्याकल्लोळ उमटला. आज भल्या सकाळीच आपण इस्रोमध्ये शास्रज्ञांची भेट घेण्यासाठी आल्यामुळे इथल्या सर्वांची अडचण झाली असावी, असे मोदी म्हणाले. “कधीकधी वाटतं की मी तुमच्यावर अन्याय करतोय. इच्छा माझी आणि संकट तुमच्यावर. सकाळी-सकाळी तुम्हा सर्वांना इथे या वेळी यावं लागलं. पण माझी फार इच्छा होती की तुम्हाला भेटून आभिनंदन करावं”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटले.
दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या भावना अनावर झाल्याचेही पाहायला मिळाले. यावेळी बोलताना, “तुमची अडचण झाली असेल. पण मला भारतात येताच लवकरात लवकर तुमच्या दर्शनासाठी यायचं होतं”, असं म्हणताना मोदींचा गळा दाटून आला. “तुम्हाला सर्वांना सॅल्यूट करायचा होता.तुमच्या श्रमांना सॅल्युट आहे. तुमच्या धैर्याला सॅल्युट आहे. तुमच्या निष्ठेला सॅल्युट आहे.. तुमच्या हिंमतीला सॅल्युट आहे”, असे मोदी म्हणाले.
“तुम्ही देशाला ज्या उंचीवर घेऊन गेला आहात, हे कुठलं साधं यश नाहीये. अंतराळात भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचा हा शंखनाद आहे. भारत चंद्रावर पोहोचला आहे. जिथे आत्तापर्यंत कुणीही पोहोचू शकले नव्हते, तिथे आपण पोहोचलो आहोत. आपण ते केले जे आधी कुणी कधी केले नव्हते. २१व्या शतकात हाच भारत जगाच्या मोठमोठ्या समस्यांचं निराकरण करेल”, असा विश्वास नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केला.