हडपसर -महापालिका निधीची उधळपट्टी करीत आहे. यावर कोणचाच अंकुश राहिलेला नाही. केवळ निधी खर्ची करण्यासाठी चुकीचे निकष लावून गुळगुळीत डांबरीकरण झालेले चांगले रस्तेही खोदले जात आहेत. गरज असते तेथे नागरी सुविधा पुरवल्या जात नाहीत याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता पुणे शहर व जिल्ह्यात चौकाचौकात आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा महाजनहीत प्रतिष्ठानचे महासचिव हेमंत ढमढेरे यांनी दिला आहे.
पुणे महापालिका हद्दीतील समस्या व नियोजन शून्य विकासकामांमुळे कोट्यवधी रुपयांच्या निधीची उधळपट्टी होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाजनहित प्रतिष्ठानच्या वतीने हडपसरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास आमदार चेतन तुपे, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, सुनील बनकर, कॉंग्रेस ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे, शिवसेना संघटक नितीन गावडे, महेंद्र बनकर, सुरेश हडदरे, उद्योजक विजय भाडळे, माजी स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे, नितीन आरु, सागरराजे भोसले, के.टी.आरु, तुषार गोफणे, कन्हेया पालेशा, सतीश भिसे, असलम जमादार, “आप’चे दिलीप गायकवाड, नामदेव साखरे, “मनसे’चे अतिश कुऱ्हाडे, तुकाराम ससाणे आदी उपस्थित होते. आंदोलनाचे नियोजन हेमंत ढमढेरे, अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली संजय मेहता शामराव शिंदे, गिरीश टिबे, विपुल भाडळे, राजू बोन्डगे, अमर चौधरी, धनंजय पोतदार यांनी केले.
महापालिकेत प्रशासकीय राज असल्यामुळे कुणाचाही अंकुश नाही, यामुळे कोणतेही नियोजन नसल्याने कोट्यवधी रुपयांची विकासकामे चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. नागरिकांच्या कररुपी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून जन आंदोलन उभारावे.
– चेतन तुपे,आमदार, हडपसर