नवी दिल्ली – भारतीय कुस्तीपटू आणि भाजप खासदार तसेच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यामधील संघर्ष हा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यातच कुस्तीपटुंकडुन होणाऱ्या आरोपावर आता खुद्द ब्रिजभूषण यांनी आक्रमक होत उत्तर दिले आहे. तसेच कुस्तीपटू यांनी देखील कारवाईची मागणी करत आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे हा वाद आणखी किती दिवस चालतोय याकडे सर्वांच लक्ष्य आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात एका अल्पवयीन मुलीसह आणखी सात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणावर ब्रिजभूषण आक्रमक होताना दिसून आले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘याआधी ते म्हणत होते की मी 100 मुलांचे लैंगिक शोषण केले आहे. आता ते 1000 मुलांचे लैंगिक शोषण झाले असे सांगत आहे. मी शिलाजीतची भाकरी खाल्ली का? हे लोक जंतरमंतरवर गेले तर मी काय राजीनामा देईन का? हे जंतरमंतरवर आंदोलन करणारे पैलवान राजकीय हेतूने प्रेरित आहेत. असा आरोप देखील त्यांनी ब्रिजभूषण यांनी केला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
नेमकी काय आहे कुस्तीपटूंची मागणी?
जंतरमंतरवर बसलेले आंदोलक यांच्याकडून ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी करत आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. विशेष म्हणजे कुस्तीपटूंच्या या विरोध प्रदर्शनाला आता राजकीय पाठबळही मिळत आहे. आतापर्यंत त्यांच्या या आंदोलनाला काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जंतरमंतरवर पोहोचून पाठिंबा दर्शवला, तर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली.
काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू उतरले मैदानात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत. या निषेधाला ‘सत्याग्रह’ असे वर्णन करून सिद्धू यांनी ट्विट केले आहे. मी दुपारी जंतरमंतर येथे कुस्तीपटूंच्या आंदोलनात सामील होणार आहे. असे आपल्या ट्विट मध्ये म्हंटलं आहे.