पंढरपूर – पंढरपूरचा पांडुरंग हा वारकऱ्यांचं आराध्य दैवत आहे. वारकरी भाविक हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी वारीची वाट पाहत असतात. लाखोंच्या संख्येने भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. तसेच या विठुरायाच्या चरणी दानशूर भाविक काही दान अर्पण करून भक्ती करत असतात. अशातच एका भाविकाने विठुरायाच्या चरणी तब्बल दोन किले सोन्याचं अनोखं दान केलं आहे.
सदर भाविक हे जालना जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आपलं नाव गुप्त ठेवण्याची अट घालून हे दान केलं आहे. या भक्ताने आपल्या विठुरायाला सोन्याचे धोतर, चंदनाचा हार आणि कंठी दान केली आहे. या गुप्त दानची किंमत तब्बल सव्वा दोन कोटी रुपये इतकी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान आज गुप्तदान केलेल्या भाविकाने याआधी नाव न सांगण्याच्या अटीवर तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचे दान केलं होतं अशी माहिती देखील समोर आली आहे. त्यानंतर पुन्हा सव्वा दोन कोटी रुपयांचं गुप्त दान या भक्ताकडून करण्यात आलं आहे.
सव्वा कोटी रुपयांच्या दानमुळे गरिबांचा देव असणाऱ्या विठुरायाची श्रीमंती आणखी वाढली आहे. कारण विठ्ठलाच्या खजिन्यात एकाच भक्ताकडून सुमारे तीन कोटींचे दान मिळाले आहे. दरम्यान, वर्षभरात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक हे विठ्ठलाच्या चरणी आपल्या इच्छेनुसार दान करत असतात. काही दिवसांपूर्वी एका महिला भाविक आजीने 1 लाख रुपये दान केले होते.