तळेगाव दाभाडे – सोमाटणे येथील टोलनाका बंद करण्यासाठी एकीकडे आंदोलन झालेले असताना दुसरीकडे मात्र जुन्या पुणे मुंबई महामार्गावर 1 एप्रिल पासून 18 टक्के टोलवाढ करण्यात येणार आहे. टोलनाका बंद करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना नव्याने होणाऱ्या टोलवाढीची टांगती तलवार मावळवासीयांवर कायम आहे.
येत्या 1 एप्रिल 2023 पासून पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर टोलच्या रकमेत 18 टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला. त्यापाठोपाठ आता जुन्या पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील टोलच्या रकमेतही 18 टक्के वाढ करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तीन वर्षांची ही एकत्रित टोलवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुणे-मुंबई प्रवास महागणार आहे.
इंधनात वाढ झाल्यानंतर सर्वच वस्तूंचे भाव वाढतात हा आजवरच अनुभव आहे. महागाईमुळे मेताकुटीला आलेल्या वाहन चालकांना दोन्ही मार्गांवर वाढीव पथकराचा भुर्दंड बसणार आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाढीव टोल येत्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. या महामार्गावरील सोमाटणे नाक्याच्या विरोधात याच महिन्यात स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले होते. महामार्गावर 60 किलोमीटरच्या अंतरात एकच नाका असावा, असा नियम आहे. प्रत्यक्षात सोमाटणे आणि वरसोली हे दोन नाके 31 किलोमीटरच्या अंतरात आहेत. त्यामुळे सोमाटणे नाका बंद करण्याची स्थानिकांची मागणी आहे. तरीही आता टोलवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरीलच नव्हे तर जुन्या महामार्गावरील प्रवासही महागणार आहे.
सोमाटणे टोलनाका बंद करावा, अशी मागणी टोल विरोधी कृती समितीने केली होती. यासाठी तळेगाव बंद, उपोषण आणि नंतर सोमाटणे टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलनही केले होते. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन संपल्यावर बैठक बालावून याबाबत तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. तोपर्यंत सर्व मोटार चालकांकडून टोल घेतला जाणार नाही, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र मंत्र्यांची पाठ फिरताच पुन्हा टोल वसूलीला सुरवात झाली. स्थानिकांनी पुन्हा टोलवसूली बंद पाडली. आता हा टोलनाका बंद करण्याऐवजी पथकरात आणखी टोलवाढ जाहीर केल्याने स्थानिक नागरिकांच्या संतापात आणखीनच भर पडली आहे.