पुणे -महापालिकेच्या मिळकतींमधील लिफ्टच्या देखभाल दुरूस्तीसाठी दरवर्षी कोट्यांवधीचा खर्च केला जातो. असे असतानाही लिफ्ट खराब होण्याचे प्रकार थांबत नसल्याचे चित्र आहे. बुधवारी दुपारी घोले रस्ता येथील महापालिकेच्या कार्यालयात बैठकीसाठी गेलेले महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे तीन अधिकारी आणि एक दिव्यांग महिला तब्बल अर्धा तास लिफ्ट मध्ये अडकून पडले. मात्र, त्यांना बाहेर काढण्यासाठी लागल्याने या अधिकाऱ्यांसह, संबधित महिलेचाही जीव धोक्या आला होता. मात्र, पुन्हा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर सर्वांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, महापालिका आयुक्त या ठिकाणी वारंवार बैठका घेतात, त्यामुळे या इमारतीच्या लिफ्टच्या देखभाल दुरूस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
नेमकी घटना काय?
महापालिकेच्या अंदाजपत्रकाचे काम सुरू आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन इमारतीत बैठक बोलाविली होती. यासाठी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख पावसकर, नंदकुमार जगताप, प्रसन्न जोशी, रणदिवे हे अधिकारी गेले होते. ते लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर जात असताना एक दिव्यांग महिलाही पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट मध्ये होत्या. लिफ्ट सुरू झाल्यानंतर काही सेंकदातच तीचा विद्युत प्रवाह बंद झाला. त्यामुळे ही लिफ्ट तळमजला आणि पहिल्या मजल्याच्या मधेच अडकली, पावसकर यांनी धोक्याचा अलार्म वाजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो वाजला नाही. त्यानंतर लगेच जनरेटर सुरू करण्यात आला. मात्र, तरीही लिफ्ट सुरू झाली नाही त्यामुळे, लिफ्ट मध्ये अडकलेले सर्वजण घाबरले. त्यानंतर विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी तब्बल अर्धा तास गेला. मात्र, तो पर्यंत आत मध्ये अडकलेल्या दिव्यांग महिल घाबरल्या होत्या. तसेच त्या खाली बसून घामाने डबडबलेल्या होत्या. त्यामुळे लिफ्ट वेळेत सुरू झाली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.
या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. तसेच या लिफ्टची तातडीने दुरूस्ती केली जाणार असून, ही घटना कशामुळे घडली याची तपासणी केली जाईल. तसेच लिफ्टची सुरक्षा तपासणी करूनच ती पुन्हा सुरू केली जाईल.
– नितीन उदास, उपायुक्त, परिमंडळ 2