बारामती (प्रतिनिधी) – दहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काटा काढल्याची घटना वडगाव निंबाळकर पोलिसांनी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित दत्तात्रय खोमणे, 23 वर्षीय महिला, शिवदत्त उर्फ दादा श्रीधर सूर्यवंशी (वय 23) व सागर सर्जेराव चव्हाण (वय 27, सर्व रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) अशी या प्रकरणातील आरोपीांची नावे आहेत.
19 फेब्रुवारी 2022 रोजी संबंधित महिलेने तिचे बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु होता. पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी पथके तयार करत, तपास सुरु केला असता. या महिलेने प्रियकर रोहित खोमणे व त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केल्याचा निष्पन्न झाले.
पोलिसांनी वडगाव निंबाळकर बस स्थानक परिसरात सापळा रचत या चौघांना अटक केली. चौकशीमध्ये त्यांनी तिच्या पतीला याला मारहाण करून पाडेगाव (ता. फलटण) येथे कालव्यामध्ये फेकून दिल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता लोणंद (ता. खंडाळा) पोलीस ठाण्यात त्यासंबंधी अकस्मात मयत दाखल असल्याचे तसेच मयताची ओळख पटली असल्याचे दिसून आले.
Gujarat Assembly Elections 2022 : गुजरातमध्ये ओवेसींमुळे कॉंग्रेसचे नुकसान
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक इंगळे, सहायक निरीक्षक सोमनाथ लांडे, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, राजू मोमीन, विजय कांचन, अजय घुले, धीरज जाधव, वडगावचे हिरामण खोमणे, पोपट नाळे, अमोल भुजबळ यांनी ही कारवाई केली.