बारामती – स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये बारामती नगरपरिषदेला देशात नववा तर महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळाला आहे. 1 ते 3 लाख लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरांमध्ये वेगाने कामगिरी करणारे शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. बारामती शहराने स्टार वन आणि वॉटर प्लस मानांकन मिळवून चमकदार कामगिरी केली आहे.
बारामती नगरपरिषदेच्या तत्कालीन नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, तत्कालीन उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, नगरसेवक सूरज सातव, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे आदींसह इतर पदाधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2021-22 मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातील 5 शहरांनी विविध श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावून पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत (दि.2) नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण व शहर राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते बारामती नगरपरिषदेस विविध श्रेणीमधील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत देश पातळीवर शहरांच्या स्वच्छतेबाबतचे परीक्षण करण्यात आले. नागरिकांचा प्रतिसाद अर्थात फिडबॅक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला होता.
पुणे जिल्ह्यातील 5 शहरांना स्वच्छ भारत अभियान 2021-22 अंतर्गत विविध श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील वर्षीही या अभियानांतर्गत नागरिकांच्या सहभागातून या वर्षापेक्षा चांगली कामगिरी होईल, असा विश्वास यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.