दसरा मेळाव्याला कार्यकर्ते नेण्यासाठी ठाकरे-शिंदे गटात चढाओढ
पुणे – दसरा मेळावा आणि शिवसेना याचे नाते अतूट आहे. करोनानंतर दोन वर्षांनी यंदा दसरा मेळावा होणार आहे. मात्र, यंदा शिवसेनेतच दोन गट पडले असून दोन्ही गट दसरा मेळावा घेणार आहेत. दरम्यान, कार्यकर्ते अद्यापही ठाकरे-शिंदे गट या संभ्रमात असले तरी दोन्ही गट दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांची पलटण जमवण्यासाठी चढाओढ रंगली आहे.
पुणे जिल्ह्यातून विशेष करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून मेळाव्यासाठी कार्यकर्ते नेण्यासाठी शिंदे गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर ठाकरे गटाकडून जिल्हा संघटनक ऍड. अविनाश रहाणे हे सरसावले आहेत. दरम्यान, शिवसेना नक्की कोणाची हे अनुत्तरीतच असले तरी दसरा मेळाव्यात यंदा दोन्ही बाजूने जोरदार राजकीय चिखलफेक आणि आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे मात्र नक्की!
आढळराव पाटील यांनी बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, हवेली, हडपसर, भोसरी या भागातून 125 बसेस व 200 चारचाकी वाहनांची सोय केली आहे. यासह अन्य वाहनांद्वारेही कार्यकर्ते बीकेसी मैदान गाठणार असल्याने हजारो कार्यकर्ते मुंबईला जातील असा विश्वास आढळराव यांना मानणारे सांगत आहेत.
ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, भांडवलदार नसल्याने कार्यकर्त्यांनी लोकवर्गणी काढून शिवतीर्थ (शिवाजी पार्क) मैदानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. आंबेगाव तालुक्यातून 10 बसेस व 50 चार चाकी वाहने जाणार असून अनेक कार्यकर्ते स्वखर्चाने एस. टीसह मिळेल त्या वाहनाने जाणार आहेत. तसेच जुन्नर, खेड, शिरूर, हवेली, भोसरी, हडपसर या भागातून मोठ्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिक शिवतीर्थवर दाखल होणार असल्याचा दावा केला जात आहे.
शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न
दसरा मेळाव्यात एकमेकांपेक्षा वरचढ ठरण्यासाठी दोन्ही गटांमध्ये स्पर्धा रंगली आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटातील सामान्य कार्यकर्त्यांनाही आत्ता मागणी वाढली असून त्यांना सन्मान मिळू लागला आहे. त्यामुळे कार्यकर्ते खुशीत आहेत.
वाद शिगेला जाण्याची चिन्हे?
दसऱ्याचा दिवस जसजसा जवळ येत आर्हें तसतसा शिवसेना-शिंदे गटातील वादही अधिक तीव्र होताना दिसत आहे. सोशल मीडियावर याबाबत खमंग चर्चा रंगू लागल्याने हा वाद आता शिगेला जाण्याची चिन्हे निर्माण दिसू लागली आहेत.