हॉलीवुड अभिनेता जॉनी डेपने त्याची पूर्व पत्नी एंबर हर्डविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यावर जगभरातील सर्व माध्यमांच्या नजरा खिळल्या होत्या. अशातच एंबर हर्डविरोधातील हा मानहानीचा खटला जॉनी डेपने जिंकला आहे. तसेच एंबर हर्डने जॉनी डेपवर लावलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं देखील ज्युरींना आढळून आलं आहे.
जॉनी डेपने पत्नी एंबर हर्डकडे मानहानीची नुकसान भरपाई म्हणून 50 मिलियन डॉलर्सची मागणी केली होती. मात्र संबंधित राज्यात असलेल्या मर्यादांमुळे जॉनी डेपला 15 मिलियन डॉलर्स म्हणजे अंदाजे 116 कोटी 33 लाख रुपये देण्यात यावे असे आदेश कोर्टाने एंबर हर्डला दिले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
2018 मध्ये एंबर यांनी वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्रात एक लेख लिहिला होता. यामध्ये त्यांनी त्या लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्याचं म्हंटलं होत. या लेखामध्ये त्यांनी कोठेही जॉनी डेपचे नाव घेतले नव्हते. मात्र तो लेख आपली मानहानी करणारा असल्याचा आरोप करत जॉनी डेपने पत्नी एंबर हर्डविरोधात खटला दाखल केला.
१५ महिन्यांमध्ये मोडलं लग्न
जॉनी डेप व एंबर हर्ड हे २०१२ पासून एकमेकांना डेट करीत आहेत. २०१५ मध्ये ते विवाहबंधनात अडकले. मात्र त्यांचार विवाह फार काळ टिकला नाही. लग्नाच्या अवघ्या १५ महिन्यांमध्ये त्यांनी हे नातं संपल्याचं जाहीर केलं. जॉनी डेप यांनी घटस्फोटानंतर एंबरला 70 लाख डॉलर्स दिले.