मुंबई : ईडीने दापोली येथील सदानंद कदम यांच्या मालकीच्या रिसॉर्टमधील सांडपाणी समुद्रात जात असल्याच्या तक्रारीच्या आधारे माझ्या घरांवर आणि माझ्याशी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली. मुळात त्या रिसॉर्टशी माझा संबंध नाही आणि अद्याप काम पूर्ण होऊन ते रिसॉर्ट सुरूही झालेले नाही. बंद रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात कसे जाईल व त्यागोष्टीचा पैशांच्या गैरव्यवहाराशी काय संबंध, असा सवाल राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला आहे दरम्यान, याच कारवाईवरून आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“आपल्या देशातील तपास यंत्रणा व न्यायव्यवस्थेवर जागतिक पातळीवर संशोधन करावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. रोजच्या रोज ‘ऐकावे ते नवलच!’ अशी इसापछाप प्रकरणे समोर येत आहेत. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरी व मित्रपरिवाराकडे गुरुवारी सकाळपासून ‘ईडी’ नामक केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी छापेमारीच्या नावाखाली गेले. त्यांनी म्हणे परबांची १२ तास चौकशी केली. गेले काही दिवस, नव्हे काही महिने दापोलीतील साई रिसॉर्टशी परबांचे नाव जोडले गेले. परब यांचा कागदोपत्री पक्क्या पुराव्यांसह दावा आहे की, संबंधित रिसॉर्टशी त्यांचा संबंध नाही. तरीही त्याविषयी ईडी, केंद्रीय पर्यावरण खात्याकडून अनेक बाबतीत नियमभंग झाल्याचा बोभाटा करून परबांना ‘टार्गेट’ केले जात आहे हे आता स्पष्टच दिसते,” असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
“ईडीची बारा तासांची छापेमारी संपल्यावर परब पत्रकारांना सामोरे गेले व म्हणाले “ज्या रिसॉर्ट प्रकरणावरून माझ्यावर छापेमारी केली ते माझे नाही. माझे मित्र कदम यांचे आहे. रिसॉर्टमधून समुद्रात सांडपाणी जाते असा गुन्हा केंद्रीय पर्यावरण विभागाने दाखल करून ईडीने मला लक्ष्य केले. यात तुमचे ते मनी लॉन्ड्रिंग वगैरेचा विषय येतोच कोठे?’’ परब यांच्या म्हणण्यानुसार संबंधित रिसॉर्ट अद्याप सुरूच झाले नाही, मग सांडपाणी समुद्रात जाईलच कसे? रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात गेले यावर संशोधन करून ईडीने छापे मारले हे नवलच आहे.
प्रश्न पर्यावरण किंवा सांडपाण्याच्या बेकायदेशीर निचऱयाचाच असेल तर ईडीने त्यांची विशेष शाखा गंगा-यमुनेच्या किनारी निर्माण करायला हवी. कोविड काळात गंगेत सांडपाणी नाही, तर सडकी प्रेते हजारोंनी वाहत होती. त्यामुळे मानवी जिवांचा आणि गंगेच्या पर्यावरणाचा प्रचंड नाश झाला. दापोलीतील रिसॉर्टच्या सांडपाण्यापेक्षा गंगेचे पूर्ण सांडपाणी त्या काळात झाले हा गंभीर गुन्हा पर्यावरणवादी ईडी किंवा सीबीआयच्या नजरेस येऊ नये हे आक्रितच म्हणावे लागेल. आता गंगेत प्रेते वाहू लागल्याने प्रदूषण झाले याबद्दल ईडी योगी आदित्यनाथांवर छापे मारणार का?,” असा सवाल शिवसेनेने केला आहे.
“केंद्रीय तपास यंत्रणांच्या सध्याच्या कारवाया या सरळ सरळ एकतर्फी व अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या आहेत. भाजपाचा एक बोबडा विझलेला फटाका ईडी, सीबीआयच्या नावे धमक्या देतो व त्याबरहुकूम कारवाया घडतात. आज याच्यावर छापे पडतील, उद्या त्याच्यावर धाडी पडतील, परवा त्यास तुरुंगात जावे लागेल असे इशारे दिले गेले व केंद्रीय यंत्रणांची विश्वासार्हता कमी करण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे विद्यमान भाजपा सरकारच्या हातातले कळसूत्री बाहुलेच बनले की काय? या यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर छापे, धाडी, अटका अशा कारवाया करीत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे पोलीस ज्या भाजपाच्या लफंग्यांवर चोरी, देशद्रोह, भ्रष्टाचार, लूटमार अशा गुह्यांवर कारवाया करीत आहेत, त्या एकजात सगळ्यांवर जणू न्यायव्यवस्था ‘मेहरबान’ होऊन दिलासे देत आहे,” असे शिवसेनेने म्हटले आहे.