नागपूर – नागपुरात राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. यासाठी पोलीसांकडून काही अटींसहित परवानगी सुद्धा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणासाठी घराबाहेर पडलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज 36 दिवसांनी अमरावतीत परतणार आहे. मात्र त्यापुर्वी राणा दाम्पत्य नागपूरात हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत. दरम्यान त्याच मंदिरात राष्ट्रवादीसुद्धा हनुमान चालिसा पठण करणार आहे.
राणा दाम्पत्य नागपुरात परतल्यावर रामनगर परिसरातील मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहे. त्याच मंदिरात राष्ट्रवादीकडून हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी पोलीसांची परवाणगी सुद्धा मिळाली आहे. पोलीसांनी यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. असे जरी असले तरी राणा समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सीआरपीसीच्या कलम 149 अंतर्गत पोलिसांनी नोटीस बजावली आहे. लाऊडस्पीकरचा वापर करु नये, मंदिरासमोर अवास्तव गर्दी जमवू नये, प्रक्षोभक वक्तव्य करू नये अशा सूचना पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपुरातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, आपल्या राजकीय फायद्यासाठी आमच्या मंदिराला राजकीय आखाडा बनवू नका, असं मत रामनगर येथील हनुमान मंदिर व्यवस्थापन समितीने व्यक्त केले आहे. हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठणासाठी कोणालाही मंदिराच्या परवानगीची गरज नाही. मात्र राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी राजकीय स्टंटबाजी करू नये अशी अपेक्षा मंदिर व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे.