पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
डेहराडून – देशातील कोविड लसीच्या संबंधात कॉंग्रेसने देशभर अफवा पसरवण्याचे काम केले असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड येथील सभेत बोलताना केला. ते म्हणाले की, पक्षाने राजकारणासाठी हे केले. देशातील कोविड स्थिती जर परिस्थिती पूर्वपदावर आली तर सरकारच्या विरोधात बोलण्यास काही उरणार नाही याची धास्ती वाटल्याने त्यांनी या अफवा पसरवल्या असे ते म्हणाले.
कॉंग्रेसने देशातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचाही अपमान केला असा आरोप त्यांनी केला. 14 फेब्रुवारीच्या निवडणुकीत उत्तराखंडच्या लोकांना या अपमानाला योग्य उत्तर दिले पाहिजे असे आवाहनही मोदींनी केले.
उत्तराखंडमधील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रुद्रपूर येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, 100 वर्षातील सर्वात वाईट आरोग्य संकट कोविड महामारीच्या रूपाने उदभवले तरीही भारतीय जनता पक्षाने या राज्यात विकासाचे काम केले.