मुंबई -शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे महाराष्ट्रातील सत्ताधारी मित्रपक्ष गोवा विधासभा निवडणूक एकत्रितपणे लढवण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यातील आघाडीवर उद्या (मंगळवार) शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रयत्नशील होते. त्यासाठी एकत्र येण्याचा प्रस्ताव त्या पक्षांनी कॉंग्रेसला दिला. मात्र, त्या पक्षांशी गोव्यात निवडणूक समझोता करण्यास कॉंग्रेसने नकार दर्शवला. त्यामुळे गोव्यातील आघाडीला अंतिम रूप देण्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी सरसावले आहेत.
आता त्यांच्यात उद्या गोव्यात बैठक होणार आहे. त्या बैठकीला प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित राहणार असल्याचे समजते. गोव्याशिवाय राष्ट्रवादी उत्तरप्रदेश आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुका लढवणार आहे.
त्या पक्षाने उत्तरप्रदेशात सपशी, तर मणिपूरमध्ये कॉंग्रेसशी हातमिळवणी केली आहे. शिवसेनाही गोवा आणि उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुका लढवणार आहे. उत्तरप्रदेशात विधानसभेच्या 50 ते 100 जागा लढवण्याचा मानस शिवसेनेने याआधीच जाहीर केला आहे.