रोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० देशांच्या नेत्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी काल रोममध्ये दाखल झाले. पंतप्रधान मोदी हे ज्यावेळी परदेशात जातात त्यावेळी ते उपस्थित असणाऱ्या नागरिकांसोबत मातृभाषेत संवाद साधताना दिसतात. त्यांनी अलीकडेच भारतीय डायस्पोरामधील अनेकांशी संवाद साधला आणि तेव्हा ते मराठी आणि गुजरातीमध्ये बोलले. दरम्यान,इटलीमध्ये मागील २० वर्षांपासून योग शिकवणाऱ्या मराठी व्यक्तीशी संवाद साधतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना आपली ओळख मराठीतून करून दिली.
'रोम' के रोम में बस गये मोदी! pic.twitter.com/hB2iBt23zG
— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) October 29, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करत असताना एक व्यक्ती समोर आली आणि म्हणाली, “नमस्कार, मी नागपूरचा!” नंतर पीएम मोदींनी गर्दीतील एका पगडीधारी माणसाला तुझे नाव काय आहे असे विचारले आणि त्यांच्याशी मराठीत संभाषण सुरू ठेवले. पंतप्रधानांनी त्याला विचारले की तो देशात काय करतो ? त्यावर त्याने सागितलं की तो २० वर्षे इटलीमध्ये योग शिकवतो, तसेच आयुर्वेदिक पद्धतींबद्दल देखील बोलला. ज्याने पंतप्रधान मोदी प्रभावित झाले. तेवढ्यात, गर्दीतील एका महिलेने पीएम मोदींना संबोधित केले आणि उत्साहाने “केम चो” ओरडले त्यावेळी पंतप्रधानांनी “माजा मा” असे उत्तर दिले. त्यांच्या उत्तराने उपस्थितांमध्ये एकच उत्साह दिसून आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० देशाच्या बैठकीच्या दौऱ्यापूर्वी एक माहिती दिली होती, त्यात त्यांनी जागतिक अर्थव्यवस्था सुधारणे आणि कोरोना संकटाचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांवर ते रोममध्ये बोलणार आहेत. एवढेच नाही तर या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिश्चनांचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप यांचीही भेट घेणार आहेत.
या भेटीदरम्यान ते व्हॅटिकन सिटीलाही भेट देतील आणि पोप फ्रान्सिस यांची भेट घेणार असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात म्हटले होते. पंतप्रधान मोदी पोप फ्रान्सिस यांना भेटण्याची त्यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच वेळ आहे. २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ते रोममध्ये असतील. यानंतर ते ग्लासगो येथे हवामान बदलावरील शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी जाणार आहेत.