नवी दिल्ली – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज एका आभासी समारंभात 51 परिचारिकांना राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान केले. सर्व आरोग्य सेवा कर्मचारी आणि परिचारिकांचे राष्ट्रपतींनी अभिनंदन केले. सेवा आणि गरजूंना मदत करण्याची प्राचीन भारतीय परंपरा आपल्या परिचारिकांद्वारे होणाऱ्या सेवेमधून प्रतिबिंबित होते असे राष्ट्रपती म्हणाले.
कोविड -19 विरूद्धच्या शौर्य लढ्यात परिचारिकांच्या निःस्वार्थ योगदानाचे तसेच राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यासाठी परिचारिका घेत असलेल्या परिश्रमाचे उदाहरण राष्ट्रपतींनी दिले. आपल्या परिचारिकांच्या सेवेप्रती असलेल्या आदर्श निष्ठेमुळे दररोज एक कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देणे शक्य झाले. तुमची मेहनत हा आशेचा किरण आहे आणि लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेतो. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना देश तुमच्या सेवेचा ऋणी राहील, असे राष्ट्रपती म्हणाले.
सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या प्रसूती सेवा आणि विमा योजना यासारख्या विविध उपक्रमांना राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. आरोग्य सेवा प्रदान करण्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणून, परिचारकांची सार्वजनिक आणि आरोग्य सेवा व्यवस्थेतील पहिला दुवा म्हणून ओळख असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.