नवी दिल्ली : देशातील करोनाची दुसरी लाट आता काही प्रमाणात ओसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रीमंडळाची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीमध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील शंका आणि प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मोदींनी सर्व मंत्र्यांना लसीकरण केंद्रावर उभे राहून लोकांच्या अडचणी समजून घेण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी करोना प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये आरोग्य मंत्रालय, नागरिक हवाई उड्डाण मंत्रालय, रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी करोना लसीकरणासंदर्भात सर्वच मंत्र्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच करोनाच्या कालावधीमध्ये हाती घेतलेले प्रकल्प रखडणार नाही याची काळजी घेण्याचेही आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात लसीकरण केंद्रावर जाणून परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी आपल्या सहकऱ्यांना केल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये करोना परिस्थितीचा आढावा घेताना करोनासंदर्भातील नियमांचे कटाक्षाने पालन करावे असे सांगितले. तसेच मंत्र्यांनी स्वत: मास्क लावण्याबरोबरच लोकांनाही मास्क लावण्याचे महत्व पटवून द्यावे. करोना संपलाय असे कोणीही समजू नये. तिसरी लाट येणारच नाही अशापद्धतीने आपल्याला काम करावे लागणार आहे, असेही मोदी यावेळी मंत्र्यांशी बोलताना म्हणाले.
पंतप्रधानांनी सर्व नेत्यांना लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घ्यावे यासाठी सर्व नेत्यांनी आजपासूनच कामाला सुरुवात करण्याची गरज असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.
पंतप्रधानांनी करोनामुळे वेगवेगळ्या मतदारासंघांमध्ये सुरु झालेल्या प्रकल्पांची कामं थांबता कामा नये अशी सूचनाही मंत्र्यांना केली. ज्या ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन किंवा बांधकामाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला तुम्ही हजेरी लावली त्या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळाही तुमच्याच हस्ते पार पडला पाहिजे अशा वेगाने काम करा, असा सल्ला मोदींनी दिली. सर्व प्रकल्पांच्या कामांवर लक्ष ठेवा आणि हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी उशीर होत नाहीय ना याची काळजी घ्या.