नाशिक – शहरातील खासगी रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय नाशिकच्या हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनकडून घेण्यात आला असून यासंदर्भात एक पत्रक काढण्यात आले आहे. यापत्रामध्ये शहारातील करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे नाशिक शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या निर्णयामागे आणखी दुसरे कारण असल्याचे बोलले जात आहे.
शहरात करोनाच्या काळात सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांवर उपचार केले आहेत. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत आजवर कोरोनावर उपचार करण्यात आले असून, यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. गेल्या दीड वर्षापासून खासगी डॉक्टर्स कोरोना रुग्णसेवा करीत असून डॉक्टर्स तसेच कर्मचाऱ्यांवर ताणही आला आहे. त्यांना विश्रांतीची गरज असल्याने कोरोना रुग्णांवर तूर्तास उपचार करणार नसल्याचे खासगी रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.
नाशिक शहातील करेाना संसर्ग आता आटोक्यात आला असून शहरातील करोना रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे सरकारी तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बऱ्यापैकी बेड उपलब्ध होत आहेत. त्यामुळे शहरातील करोना रुग्णांना उपचार मिळण्यास अडचण येणार ऩाही असे कारण देत यापुढे खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घेणार नसल्याचे असोसिएशनने नमूद केले आहे.
नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी खासगी रुग्णालयांकडून सुरू असलेली रुग्णांची लूट तात्काळ थांबवावी. अन्यथा हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यात आता रुग्णालयांनी करोना रुग्णांना उपचार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यासंदर्भात महापौर काय भूमिका घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.