पुणे : करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रूग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून त्याच ठिकाणी कुशल मनुष्यबळ तयार करावे याकरिता जिल्ह्यामध्ये सन 2021 साठी ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुक असलेल्या राज्यातील युवक – युवतींना रुग्णालयांकडे उपलब्ध असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून प्रामुख्याने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रशिक्षित होणारे मनुष्यबळ आरोग्य यंत्रणेकडे कार्यरत होण्याकरिता त्वरित उपलब्ध होऊ शकणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय , वैद्यकीय संस्था तसेच 20 पेक्षा अधिक बेड ची सोय असणारी खाजगी रुग्णालये या कार्यक्रमाअंतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून सूचीबद्ध होऊन त्याद्वारे प्रशिक्षण देण्यास पात्र होऊ शकणार आहेत.
प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत देणार येणारे प्रशिक्षण हे उमेदवारांना पूर्णपणे नि:शुल्क असून सूचीबद्ध प्रशिक्षण शिक्षणाकरता सूचीबद्ध प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षणाकरिता टप्पे निहाय प्रशिक्षण शुल्क महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत आधार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रुग्णालयांनी ऑनलाइन लिंक वर उपलब्ध असणाऱ्या गुगल फार्मच्या माध्यमातून प्रशिक्षण संस्था नोंदणीसाठी आपली इच्छुकता नोंदविणे अनिवार्य आहे. इच्छुकता नोंदविण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त व शासकीय रुग्णालय, वैद्यकीय संस्था तसेच निकषानुसार पात्र ठरणारी खासगी रुग्णालये यांनी ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण’ कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा. याबाबत अधिक माहिती करिता कार्यालयाच्या 02026133606 या दुरध्वनी क्रमांकावर अथवा punerojgar@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शासनाच्या पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.