नवी दिल्ली: कोरोनामुळे देशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा रोज नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. त्यातच देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला. यामुळे 1 मेपासून खुल्या बाजारात कोरोना लसींची विक्री करण्याची परवानगी कंपन्यांना मिळाली आहे. मात्र 1 मेपासून कोरोनाची लस मेडिकलच्या दुकानांमध्ये मिळणार नाही. याच दरम्यान सीरमची लस भारतातच सगळ्यात महाग असल्याची माहिती आता समोर आली आहे. श्रीलंका, बांगलादेशातही ‘खासगी’पेक्षा ‘कोविशिल्ड’ स्वस्त मिळत आहे.
खासगी रुग्णालयात 1 मे पासून भारतीयांना 600 रुपये प्रत्येकी कोविशिल्ड लस उपलब्ध होणार आहे. जगात या लसीसाठी भारतीयांना सगळ्यात जास्त पैसा मोजावा लागणार आहे. या लसीचे उत्पादन आणि वितरण पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटकडे आहे. पहिले दहा कोटी लसीचे डोस भारत सरकारला ‘सीरम’ने 150 रुपयाला दिले होते.
आता राज्य सरकारला 400 आणि खासगी हॉस्पिटलला 600 रुपये दराने लसींची खरेदी करावी लागणार आहे. सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी ‘कोविशिल्ड लस आम्ही 150 रुपयांत विकली तरी नफ्यात राहू’ असं विधान लस बाजारात येण्यापूर्वी केले होते. पण सध्याची स्थिती बघता कोविशिल्ड ही जगात भारतात सर्वात जास्त किंमतीला विकली जाते आहे.
कोविशील्ड लसीच्या भारतासह इतर देशातील किंमती..
भारत : 8 डॉलर
सौदी : 5.25 डॉलर
अमेरिका : 4 डॉलर
ब्राझील : 3.15 डॉलर
युके: 3 डॉलर
युरोपियन युनियन: 2.15 ते 3.50 डॉलर
दक्षिण आफ्रिका : 5.25 डॉलर
बांग्लादेश : 4 डॉलर
श्रीलंका : 4.50 ते 5 डॉलर