नवी दिल्ली : लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा रात्री उशिरा सोशल मीडियावर पसरली होती. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सुमित्रा महाजान यांचे निधन झाल्याचे ट्विट केले होते. मात्र ही अफवा असल्याचे समजल्यानंतर शशी थरुर यांनी ट्विट डिलिट केले आणि त्यांच्या निरोगी दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, या प्रकरणावर सुमित्रा महाजन यांनी संताप व्यक्त केला आहे. खातरजमा करण्याअगोदर माझ्या निधनाची बातमी देण्याची कसली घाई होती असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
How could news channels run a report on my so called demise without even cross checking with the Indore administration? My niece refuted Mr. Tharoor on Twitter but what was the urgency in announcing without confirmation?: Sumitra Mahajan, former Lok Sabha speaker (File photo) pic.twitter.com/eE6mv15rly
— ANI (@ANI) April 23, 2021
गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याचे ट्विट करत श्रद्धांजली वाहिली होती. जेव्हा शशी थरूर यांना समजलं की ही अफवा आहे तेव्हा ट्विटरवर आधीचं ट्विट डिलिट केलं. त्यांनी म्हटले की, अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात हे धक्कादायक आहे. सुमित्रा महाजन यांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना. थरुर यांना यामुळे ट्रोलही केलं जात आहे. दुसरीकडे सुमित्रा महाजन यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, न्यूज चॅनेल्सनी कशी काय याबाबत बातमी चालवली? त्यांनी किमान एकदा इंदौर प्रशासनाला तरी विचारायचं होतं.
सुमित्रा महाजन यांनी, न्यूज चॅनेल्स कसं काय अशी बातमी देऊ शकतात, माझ्या निधनाची बातमी देण्याआधी किमान इंदौरच्या प्रशासनाकडे चौकशी तरी करून घ्यायची. माझ्या भाचीने याबाबत थरूर यांना ट्विटरवर ही अफवा असल्याचे सांगितले. पण खात्री करण्याआधीच असं ट्विट करण्याची काय घाई होती? असा प्रश्नही सुमित्रा महाजन यांनी विचारला.
शशी थरुर यांच्या ट्विटवर भाजपचे राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गीय यांनीही उत्तर देत म्हटले की, सुमित्रा महाजन यांची प्रकृती ठणठणीत आहे. देव त्यांना दीर्घायुष्य देवो. त्यानंतर थरुर यांनी सुमित्रा महाजन यांच्या निधनाबद्दल केलेले ट्विट डिलिट केले. सुमित्रा महाजन यांना ताप आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली होती. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.