#IPL2021 : मुंबई-पंजाबमध्ये आज लढत

चेन्नई -आयपीएल लीगमध्ये पाच वेळा विजेतेपद जिंकलेल्या मुंबई इंडियन्सची 2021च्या आयपीएल हंगामातील कामगिरी समाधानकारक राहिली आहे. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्यात आरसीबीविरूद्ध पराभव झाल्यानंतर पुढील दोन सामन्यांत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबादविरूद्ध विजय नोंदवला. पण दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात पुन्हा त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. सध्या मुंबई इंडियन्समधील फलंदाजांची मधली फळी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असल्याने मुंबई इंडियन्स पुढे चिंता निर्माण झाली असून आज त्यांचा सामना पंजाब किंग्ज विरूद्ध होणार आहे. दुसरीकडे पंजाबही पुन्हा विजयी पथावर येण्यास उत्सुक आहे.

मुंबई संघातील गोलंदाजांनी केलेल्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्यांना दोन विजय मिळविता आले आहे. परंतु दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तशी कामगिरी करता आली नाही. मुंबई संघातील फलंदाजांना अद्यापपर्यंत मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला पुन्हा लय सापडल्याचे दिसून आले. परंतु 2020मध्ये निर्णायक योगदान देणारे सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांना चांगली कामगिरी करता आली नाही. यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे. याशिवाय कायरान पोलार्ड आणि पंड्या बंधू हार्दिक आणि कृणालही अपेक्षित प्रदर्शन करण्यात अपयशी ठरले आहेत.

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने आतापर्यत चांगली कामगिरी केली आहे. परंतु पंजाबविरुद्ध आज होणाऱ्या सामन्यात त्यांच्या खेळाडूंना आपला फॉर्म पुन्हा मिळवावा लागणार आहे. दुसरीकडे पंजाबने विजयी सलामी दिली होती. त्यानंतर त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे. सनरायजर्स हैदराबादसोबत बुधवारी झालेल्या सामन्यात त्यांना फक्‍त 120 धावाचा करता आल्या होत्या. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ अद्याप संयोजन स्थापित करण्यात अपयशी ठरली आहे.

पंजाबची फलंदाजी मजबूत आहे. परंतु राहुल आणि मयंक आग्रवालशिवाय अन्य फलंदाज मोठी खेळी करू शकलेले नाही. तसेच गोलंदाजांनाही अपेक्षित प्रदर्शन करता आलेले नाही. “यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलही तुफान खेळी करू शकलेला नाही. तसेच वेस्ट इंडीजचा त्याचा जोडीदार निकोलस पूरनही अयशस्वी ठरत आहे. सलग तीन पराभव झाल्याने पंजाबचे मनोबल निश्‍चितच खालावले असेल. परंतु यातून सावरत त्यांनी पुन्हा विजय न मिळविल्यास त्यांना प्लेऑफची संधी गमवावी लागेल.

आतापर्यतच्या चार सामन्यात राहुलने दोन अर्धशतक ठोकले आहे. परंतु अन्य फलंदाजांकडून म्हणावी तशी साथ मिळाली नाही. तसेच दीपक हुड्डाने आपली अष्टपैलू क्षमता दाखविली आहे. मात्र, त्यात सातत्यता ठेवणे आवश्‍यक आहे.

सामन्याची वेळ
सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः एम. ए. चिदम्बरम स्टेडियम, चेन्नई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्‌सवर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.